ठाणे पोलीसांनी १५६ दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून हस्तगत केल्या २३० दुचाक्या

ठाणे पोलीसांनी वाहन चोरीच्या अनेक घटना उघडकीस आणल्या असून १५६ दुचाकी चोरांकडून २३० दुचाक्या जप्त केल्या आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयात दुचाकी वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळं ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा, मालमत्ता शोध कक्ष, खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे युनिट क्रमांक १ ते ५ या सर्वांचा मिळून वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार केली होती. या पथकांनी दिवसरात्र पाळत ठेवून आरोपींना रंगेहात पकडलं आहे. काही ठिकाणी मागोवा काढून शिताफीनं वाहनांसकट जेरबंद करण्यात आलं आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन महिन्यात वाहन चोरीचे २०७ गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये १५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी २३ दुचाकी वाहनं आणि एक चारचाकी वाहनाचे मालक मिळाले आहेत. पोलीसांनी या चोरांकडून २३० दुचाकी वाहनं जप्त केली आहेत. दुचाकी वाहनं चोरणा-या आरोपींपैकी काही आरोपी हे गाड्यांच्या बनावट चाव्या बनवून गाड्या चोरी करत होते तर काही चोर दुचाकी वाहनांची हँडल जोराने हिसका मारून तोडून गाडी ढकलत पुढे नेत असत आणि नंतर इग्नीशनची वायर जोडून गाडी थेट चालू करून पळून नेत असत. एक चारचाकी वाहनं चोरी करणारी टोळी अपघातात सर्वनाश झालेल्या वाहनांची इन्शुरन्स कंपनीकडून खरेदी करून त्याच प्रकारच्या मॉडेलच्या गाड्या चोरून त्यांचे चेसीस इंजिन नंबर नष्ट करून पुढे त्या गाड्या विकत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. ठाणे, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण अशा विविध ठिकाणाहून वाहन चोरी करणा-या टोळ्या नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ज्यांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत आणि अद्याप त्या मिळाल्या नाहीत त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading