जस्ट डायलद्वारे मिळालेल्या फोन नंबरवरून इलेक्ट्रीक सामानाच्या वितरकांशी संपर्क साधून फसवणूक करणा-या भामट्याला अटक

जस्ट डायलद्वारे मिळालेल्या फोन नंबरवरून इलेक्ट्रीक सामानाच्या वितरकांशी संपर्क साधून फसवणूक करणा-या भामट्याला ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकानं अटक केली आहे. पुरनचंद जैन आणि भूमाराम कुम्हार अशा दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांनी ११ वितरकांना गंडा घातल्याचं तपासात उघड झालं आहे. हे दोघे जस्ट डायलला दूरध्वनी करून इलेक्ट्रीक विक्रेत्यांचे नंबर मिळवत असत. नंतर या विक्रेत्यांशी संपर्क साधून इलेक्ट्रीक सामान म्हणजे बल्ब, वायर, कॉपर वायर, पंखे, स्वीच अशा सामानांची मागणी नोंदवत असत. त्यानंतर विक्रेत्याला हे सर्व सामान एखाद्या दुकानासमोर ठेवायला सांगत. त्यानंतर पुन्हा वितरकाशी संपर्क साधून त्यांना पैसे घेण्यासाठी इतर ठिकाणी बोलवत असत. वितरकांची माणसं पैसे आणण्यास इतर ठिकाणी गेली की हे दोघं सामान लंपास करून फरार होत असत आणि सामानाचे पैसेही देत नसत. ज्या दुकानासमोर इलेक्ट्रीक सामान उतरायला सांगत अशा दुकानदारांशी ही मंडळी मारवाडी भाषेत बोलून त्यांना सामान दुकानासमोर ठेवण्याची विनंती करत असत. फसवणुकीच्या प्रत्येक घटनेत हे दोघे नवं सीमकार्ड वापरत असत. काम झालं की सीमकार्ड फेकून देत असत. अशाप्रकारे आठवड्यातून तीन दिवस हा प्रकार करत आणि मिळवलेला माल कमी रक्कमेत चोर बाजारात विकत असत. पोलीसांनी आत्तापर्यंत या दोघांकडून अंधेरी, बोरिवली, दहीसर अशा ठिकाणचे ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या दोघांच्या आणखी एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading