घोडबंदर परिसरात तीव्र पाणीटंचाईबाबत मनोहर डुंबरेंचा आंदोलनाचा इशारा

यंदा सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, घोडबंदर रोडवरील हजारो कुटूंबांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास, कोरोनाच्या आपत्तीतही रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला आहे. त्याचबरोबर पाण्याच्या नव्या जोडणी स्थगित करण्याची विनंतीही केली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील कोलशेत, ब्रह्रांड, हिरानंदानी इस्टेट, डोंगरीपाडा, पातलीपाडा, वसंतलिला, विजय नगरी, वाघबीळ परिसरात जानेवारीपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. प्रभाग क्रमांक दोनप्रमाणेच संपूर्ण घोडबंदर रोड पट्ट्यातील हजारो कुटूंबांना जानेवारीपासून पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे.
साधारणत: १५ जूनपर्यंत पाण्याचा साठा पुरविण्यासाठी जानेवारीपासून दर आठवड्याला शटडाऊन घेतला जातो. या शटडाऊननंतर पुढील एक ते दोन दिवस अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होतो. जानेवारीत शटडाऊन सुरू झाल्यानंतर पाणीटंचाईचे दुष्टचक्र कायम राहिले. आता सप्टेंबर महिन्यापर्यंत मुसळधार पाऊस सुरू असून, धरणे १०० टक्के भरली आहेत. मात्र, ठाणे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगण्यात येतात. शटडाऊनमुळे पाण्याचा कमी दाब, झाडे कोसळली, मेट्रोच्या कामामुळे पाईपलाईन फुटली, वीजपुरवठा खंडित आदी विविध कारणे सांगून जनतेची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात या भागात तीव्र पाणीटंचाई सुरू असल्याचे वास्तव आहे, याकडे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.
या परिस्थितीमुळे घोडबंदर रोडसह प्रभाग क्रमांक २ मधील नागरिक संतप्त आहेत. पाणीटंचाईबाबत जनभावनेचा उद्रेक होण्यापूर्वीच महापालिकेने दखल घ्यावी. अन्यथा, कोरोनाच्या आपत्तीतही रस्त्यावर उतरुन नागरिकांना तीव्र आंदोलन करावे लागेल. त्याचबरोबर या भागातील पाणीटंचाई दूर होईपर्यंत पाण्याच्या नव्या जोडण्या देऊ नयेत, अशी मागणीही मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading