ग्लोबल हॉस्पीटलमध्ये ऑनलाईन नोंदणीनंतरही गोंधळ कायम

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच कडक निर्बंध जारी करण्यात आले असले, तरी ठाण्यातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलबाहेर लसीकरणासाठी शनिवारी गर्दीचा महापूर उसळला. विशेषत: ऑनलाईन नोंदणी असतानाही दुपारच्या सत्रातील नागरिकांनाही चक्क १२.३० च्या सुमारास प्रवेश दिल्यामुळे गर्दी झाली होती. या प्रकाराकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे. ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत ऑनलाईनद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी एक हजार नागरिकांना नोंदणी दिली होती. त्यामुळे शनिवारी सकाळपासून ग्लोबल हॉस्पिटलच्या परिसरात गर्दी उसळली होती. बाळकूम ते साकेत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्यामुळे केवळ एका मार्गिकेतच फुटपाथवर रांग, रस्त्यालगत नागरीक आणि पोलिसांची वाहने आणि काही वेळा होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे गोंधळ उडाला होता, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये लसीकरणासाठी सकाळी ९ ते १ दरम्यानच्या चार तासासाठी प्रत्येकी एक तासाचा टप्पा निश्चित केला आहे. तर दुपारच्या सत्रासाठी दुपारी २ ते सायंकाळी ६ दरम्यान प्रत्येकी तासाभराच्या टप्प्यानुसार नोंदणी दिली गेली. मात्र, हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्याने सरसकट नागरिकांना प्रवेश दिला. त्यानंतर हॉस्पिटलमधील नोंदणीवेळीही नागरिकांकडील मोबाईल वा एसएमएसनुसार वेळेची तपासणी केली गेली नाही. त्यामुळे रांगेत उभे राहिलेले दुपारच्या सत्रातील शेकडो नागरीक सकाळच्या सत्रातच प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारात गर्दी उसळली होती. इतरवेळी अवघ्या तासाभरात होणाऱ्या लसीकरणाला तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. दुपारी दीडच्या सुमारास सातव्या मजल्यावर १०० हून अधीक नागरीक एकत्र आले होते. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला, अशी तक्रारनारायण पवार यांनी केली आहे. नागरिकांच्या हालांची दखल घेऊन योग्य नियोजन करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. पासपोर्ट कार्यालयात अर्ध्या तासाचे स्लॉट दिले जातात. त्यानुसार रांगा लावल्या जातात. सद्यस्थितीत कोरोना संसर्गामुळे वेळेनुसार रांगा शक्य नसल्या, तरी वेळेआधी आलेल्या नागरिकांना थांबविण्याची गरज आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर प्रत्येक तासाच्या स्लॉटनुसारच ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नागरिकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी करत ग्लोबलमध्ये दिवसभरात २ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यापेक्षा ठाण्यातील पाच ठिकाणी प्रत्येकी ४०० नागरिकांचे लसीकरण केल्यास गर्दीचीही विभागणी होईल, अशी सुचना नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading