गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेत मुलांना लसीकरण करण्याचं महापालिकेचं आवाहन

लहान मुलांना होणा-या गोवर या संसर्गजन्य आणि घातक आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यात येत्या मंगळवारी मिझेल रूबेला लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. एका पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी ही माहिती दिली. लहान मुलांना होणारा गोवर हा संसर्गजन्य आणि घातक आजार आहे. शासनानं २०२० पर्यंत गोवर निर्मूलन आणि रूबेला आजाराचं नियंत्रण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या मोहिमेसाठी महापालिकेनं ५ लाख ८२ हजार ३४९ मुला-मुलींना ही लस देण्याचं उद्दिष्ट ठरवलं आहे. ९९९ शाळांमधील ३ लाख ७७ हजार ५२४ मुलांना प्रथम लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ३५ ते ४० टक्के लाभार्थींचे गोवर लसीकरण, अंगणवाडी केंद्र आणि नियमित लसीकरण केंद्र येथे केले जाणार आहे. मिझेल रूबेला आजारापासून संरक्षण व्हावं म्हणून ९ महिने ते १५ वयोगटातील मुला-मुलींचे या मोहिमेत लसीकरण केलं जाणार आहे. २७ नोव्हेंबर पासून सुरू होणारी ही मोहिम ५ आठवड्यात चालणार आहे. गोवर झाला की शरीरातील प्रतिकारशक्ती झपाट्यानं कमी होते. त्यामुळं मुलांच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता जाणवते. परिणामी बालकांची दृष्टी जाण्याची भीती असते. या व्यतिरिक्त बालकांना न्यूमोनिया, अतिसार आणि मेंदूज्वर असे आजार होण्याची शक्यता असते. गोवर, रूबेला लसीकरणामुळं या आजाराचे प्रमाण कमी करता येऊ शकते. म्हणून सर्वांनी आपल्या मुलांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण करावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading