गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या मागणीला महापालिकेकडून वाटाण्याच्या अक्षता शाखेत मात्र परवानगी – नारायण पवार

प्रामाणिकपणे महापालिकेचा हजारो रुपयांचा कर भरणाऱ्या गृहसंकुलांमध्ये लसीकरणाच्या विनंतीला महापालिका प्रशासनाकडून `वाटाण्याच्या अक्षता’ दाखविल्या गेल्या. मात्र, चंदनवाडीतील शिवसेना शाखेत लसीकरण शिबिर घेण्यास महापालिकेने कोणत्या आधारावर परवानगी दिली, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेला विचारला आहे. कुपन पळवापळवी होत असताना, आता शिवसेनेने संपूर्ण लसीकरण शिबिर आम्हीच केल्याचे भासविले. ही `बनवाबनवी’ महापालिकेला मान्य आहे का, असा सवाल पवार यांनी केला आहे. महापालिकेने केवळ खासगी हॉस्पिटलला सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिर घेण्यास परवानगी दिली आहे. ठाण्यातील शेकडो गृहसंकुलांकडून महापालिकेकडे मोफत लसीकरण शिबिर घेण्याची मागणी केली जात होती. या संदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. आता अचानकपणे शिवसेनेच्या चंदनवाडी शाखेमध्ये महापालिकेकडूनच शिबिर भरविण्यात आले. या शिबिराला शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महापालिकेची यंत्रणाही शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशावर काम करीत होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिवसेना शाखेत शिबिराची परवानगी देताना, शिवसेनेचे बडे नेते आणि महापालिका प्रशासनाला गृहसंकूलांच्या मागणीचा सोयिस्कर विसर पडला, अशी टीका पवार यांनी केली. या शिबिरासाठी केंद्र सरकारच्या नियमावलीचे पालन करण्यात आले होते का याची चौकशी करावी अशी मागणीही नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading