खाजगी वित्तीय कंपनीच्या गुंतवणूक योजनेत दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक

खाजगी वित्तीय कंपनीच्या गुंतवणूक योजनेत दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे. खाजगी गुंतवणूक कंपनीत मासिक आवर्त ठेव योजनेत रक्कम गुंतवल्यास बक्कळ व्याजाचं आमिष दाखवून दिवा वासियांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघा भामट्यांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोहित कांबळे आणि दीपा शिंदे या दोघांनी डिसेंबर २०१७ पासून दिव्यातील नागरिकांना साडेबारा टक्के व्याजाचं प्रलोभन दाखवून ९ लाख ५८ हजार रूपयांची फसवणूक केली अशी तक्रार दिव्यातील माया साबळे या महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात केली आहे. अतुल्य मायक्रो फायनान्स कंपनीच्या मासिक आवर्त ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास साडेबारा टक्के दरानं व्याज मिळेल असं प्रलोभन या दोघांनी दाखवलं होतं. त्यानुसार अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली. सुरूवातीला वेळेवर रक्कम भरणा केलेल्या पावत्या हे दोघेजण दिव्यातील नागरिकांना देत होते. कालांतराने पावत्या देणं बंद झालं. वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्याजासह रक्कम मागितली असता दोघेही टाळाटाळ करू लागले. या दुकलीनं सुरूवातीचे दोनच हफ्ते कंपनीत भरणा करून उर्वरित १० टक्के स्वत:साठी खर्च केले. आता पोलीस या दोघांच्या शोधात आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading