कोविड रुग्णालयाचे नियोजन खासगी कंपनीला देऊन पालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे का – संजय वाघुले

विशेष कोविड रुग्णालयाचे नियोजन खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव असून महापालिकेकडून कंपनीला प्रती बेड दररोज ५०० ते १५०० रुपये देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असून कोरोना नियंत्रणात आणायचाय कि महापालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे. या कंपनीकडून डॉक्टर, नर्ससह वैद्यकिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकांना मनुष्यबळ मिळत नसताना कंत्राटदाराला कर्मचारी कोठे मिळणार असा सवाल करीत निविदा रद्द करण्याची मागणी वाघुले यांनी केली आहे. विशेष कोविड रुग्णालयात १०२४ रुग्ण क्षमता असताना केवळ ३३० रुग्णांना दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जितो ट्रस्ट-एमसीएचआयला निधी उभारण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली होती. या निधीचा हिशोब जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत आता रुग्णालयाचे नियोजन खासगी कंपनीला दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रतिदिन सामान्य कक्षासाठी ५०० रुपये, ऑक्सिजन उपलब्ध बेडसाठी ७५० रुपये आणि आयसीयूतील बेडसाठी १५०० रुपये दिले जाण्याबाबत विचार सुरू आहे. १०२४ बेडच्या रुग्णालयातील ५०० बेडवर ऑक्सिजन सुविधा आहे. तर आयसीयूत ७६ बेड असून, त्यातील ५० सुरू आहेत. त्यामुळे दररोज कंत्राटदाराला लाखो रुपये शुल्क मिळणार असल्याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. शहरातील खाजगी रुग्णालये लाखो रुपये उकळत असतानाही विनामूल्य कोविड रुग्णालयात केवळ ३३० रुग्ण दाखल आहेत. विशेष कोविड रुग्णालयावर महापालिकेने आतापर्यंत किती खर्च केला, ते जाहीर करावे. तसेच कोविड रुग्णालयाच्या नियोजनाबाबत काढलेली निविदा रद्द करुन महापालिकेमार्फतच रुग्णालयाचा कारभार चालवावा अशी मागणीही वाघुले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading