कोलबाड परिसरात सुरू करण्यात आलेल्या सातव्या शेतकरी आठवडा बाजाराचं उद्घाटन

राज्यामध्ये यंदा दुष्काळ असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातली भाजी थेट आपल्या दारी हा उपक्रम शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन नाम फौंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी केलं. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कृषी पणन मंडळाच्या सहकार्यानं कोलबाड परिसरात सुरू करण्यात आलेल्या सातव्या शेतकरी आठवडा बाजाराचं उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं. केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्यामध्ये ७ ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. ठाणेकरांनी गेल्या दोन वर्षात या सातही आठवडी बाजारांना मोठा प्रतिसाद दिला असून गेल्या दोन वर्षात २ हजार टनाच्या आसपास भाजी विक्री या आठवडा बाजारातून झाली आहे. थेट शेतातील कोथिंबीर, मिरची, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, फरसबी, ढोबळी मिरची, दुधी भोपळा, लाल भोपळा, कांदा, बटाटा अशा २७ प्रकारच्या भाज्या ठाणेकरांना उत्तम दर्जाच्या मिळत आहेत. कोलबाड येथील आठवडी बाजारात नाशिक, जुन्नर, शहापूर, सिन्नर या ठिकाणचे शेतकरी सहभागी झाले आहेत. सरकारने धान्यावरचे निर्बंध उठवल्यामुळे काही आठवडा बाजारात तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूरडाळ, मूगडाळ, चणाडाळ, नाचणी, जवस आणि कडधान्याची विक्री होत आहे. कोलबाड येथील आठवडी बाजारातही लवकरच धान्य विक्रीस ठेवले जाईल असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading