कोरोनाच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेप्रमाणे ग्लोबल टेंडर काढण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी

काही उपाययोजना करून कोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढावं अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई महापालिकेनं १ कोटी वायल साठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या लसी येतील तेव्हायेतील पण मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे महापालिकेनंही लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावं अशी सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आता पावसाळा तोंडावर असून लसीकरणासाठी नागरिकांना ऊन्हा-पावसात ताटकळत रहावं लागतं. यासाठी काशीनाथ घाणेकर आणि गडकरी रंगायतनचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणासाठी करावा अशी सूचना प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना आमदार, खासदारांच्या निधीतून २५ टक्के निधी त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवकांच्या निधीतून २५ टक्के निधी, काही निधी राज्य शासनाकडून तर उर्वरित खर्च महापालिकेनं उचलून निविदा काढण्याची गरज सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. यासाठी विकास कामांना थोड्याफार प्रमाणात कात्री लावावी लागली तरी सर्वसामान्य माणसांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. आवश्यकता भासल्यास पुढील वर्षी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विशेष कोरोना कराची आकारणी केल्यास या गोष्टीसाठीही नागरिकांची सहमती असेल असं वाटतं. नव्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अनेक प्रस्ताव पडून असल्याची चर्चा आहे. हे प्रस्ताव कायदेशीर तपासून जरी मंजूर केले तरी महापालिकेच्या उत्पन्नात २०० ते ३०० कोटी रूपये मिळू शकतात. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कोरोना व्हॅक्सीनचे ग्लोबल टेंडर काढावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading