कोपरी पूलाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश

कोपरी पूलाच्या पहिल्या टप्प्याचं काम मे २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोपरी पूलाच्या रूंदीकरणाच्या कामामुळे पूर्व द्रूतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते याची दखल घेत एका बैठकीचं आयोजन नगरविकास मंत्र्यांनी केलं होतं. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसह मुंबई महापालिका, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नव्यानं उभारण्यात येणा-या कोपरी पूलाच्या पायलिंगचे काम ९० टक्के पूर्ण झालं आहे. पूलाच्या गर्डरचं काम पालघर येथे सुरू आहे. फेब्रुवारी अखेर पायलिंगचं काम पूर्ण होऊन त्यानंतर पुढील अडीच महिन्यात गर्डरचं काम पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर अस्तित्वातल्या जुन्या पूलाच्या दोन्ही बाजूंना नव्यानं उभारल्या जाणा-या या पूलावरून वाहतूक सुरू करणं शक्य होणार आहे. त्यानंतर जुना पूल पाडून मे २०२१ अखेर पर्यंत नव्या पूलाची उभारणी केली जाईल. त्यानंतर या पूलावरून आठ पदरी वाहतूक सुरू होईल अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. या पूलाचं पहिल्या टप्प्याचं काम १५ मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ, कामाचा वेग वाढवा, रात्रंदिवस युध्दपातळीवर काम करा असे आदेश या बैठकीत देण्यात आले. या कामाचा साप्ताहिक अहवाल सादर करण्याचे आदेशही या बैठकीत नगरविकास मंत्र्यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading