गुंतवणुकीवर दामदुपट रक्कमेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा

गुंतवणुकीवर दामदुपटीवर रक्कमेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. असे प्रकार अनेकवेळा समोर येत असतानाही या प्रकारांमध्ये भरच पडत आहे. मुंब्रा अमृतनगर येथे राहणा-या शबिना खान यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिडास इंडिया प्रॉपर्टी लिमिटेड नावाच्या बंगलोर येथील कंपनीनं ठाण्यातील हायस्ट्रीट मॉल आणि कापुरबावडी येथील हायलँड कॉर्पोरेट सेंटर येथे आलिशान कार्यालय थाटलं होतं. या कंपनीचे व्यवस्थापक आलम शेख यांच्याशी शबिना यांचा परिचय होता. त्यांनी शबिना यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास १८ महिन्यात दामदुप्पट रक्कम देण्याचा तसंच कंपनीच्या विविध योजनांची माहिती त्यांना दिली. शबिना आणि त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल २१ लाख रूपये यामध्ये गुंतवले. इतर गुंतवणूकदारांनीही २०१५ पासून २०१८ पर्यंत लाखो रूपये रोखीनं तसंच इतर माध्यमातून गुंतवले. मात्र मुदतीअंती दिलेले धनादेश वटले नाहीत तेव्हा गुंतवणूकदारांनी कंपनीचे कार्यालय गाठले. तिथे कंपनीचे मालक महम्मद हुसैन आणि व्यवस्थापक शेख हे त्यांना भेटले. त्यांनी कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सांगून थातुरमातुर उत्तरं दिली. काही दिवसांनी कंपनीच्या कार्यालयांना टाळे लावल्यानं आढळल्यानं हादरलेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. आत्तापर्यंत ३५ गुंतवणूकदारांनी ९३ लाखांचा अपहार झाल्याची तक्रार केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading