कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची आपल्या विविध मागण्यांसाठी १८ जूनला बंदची हाक

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं १८ जून रोजी बंदची हाक दिली आहे. राज्य शासनानं मुक्त केलेले ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्यांना तातडीनं स्थगिती द्यावी, रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ करावी, ऑटो रिक्षा कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी अशा प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांसाठी ही बंदची हाक देण्यात आली असून प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा जमा करून विधानभवनावर मोर्चा नेला जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध सर्वपक्षीय टॅक्सी युनियनचा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ आहे. या महासंघाचा मेळावा ठाण्यात झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश पेणकर यांनी ही माहिती दिली. ऑटो रिक्षा टॅक्सी परवाने मुक्त केल्यानं रिक्षा टॅक्सीच्या संख्येत पाचही जिल्ह्यात भरमसाठ वाढ झाली आहे. शासनाला महसुल मिळावा म्हणून अमर्याद रिक्षा टॅक्सी परवान्यांचे वाटप केले गेले आहे. बेरोजगारांना उपजिविकेचे साधन म्हणून परवाने मुक्त केले गेले पण स्वत:चा व्यवसाय असलेलेही आणि नोकरदार यांनी गरज नसताना जोडधंदा म्हणून रिक्षा टॅक्सी परवाने घेतले आहेत. हे मुक्त परवाना धोरण बंद करून परवाने वाटपाला १५ वर्ष स्थगिती देण्याची महासंघाची प्रमुख मागणी असल्याचं प्रकाश पेणकर यांनी सांगितलं. रिक्षाचे किमान भाडे १८ वरून २२ तर टॅक्सीचे किमान भाडे २२ वरून ३० करावे, माथाडी कामगारांच्या धर्तीवर ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, सीएनजी गॅस बाटला हायड्रो टेस्टींगचे २ हजार ५५० रूपयांचे अन्यायकारक शुल्क रद्द करावे अशा मागण्यांसाठी हा बंद असल्याचं प्रकाश पेणकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading