कल्याण स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला गती मिळणार

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेवरील कल्याण या महत्त्वाच्या स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेत या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या कामासाठी आवश्यक जागेची उपलब्धता असल्याने रेल्वे प्रशासन प्रत्यक्ष काम सुरू करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. कल्याण येथे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक पाहता येथील मार्गिका आणि फलाट कमी पडू लागले आहेत. त्यामुळे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात कल्याण रेल्वे स्थानकाच्या रीमॉडेलिंग प्रकल्पाला चार वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. सुमारे 800 कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मालवाहतूक यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. प्रवासी सुविधेसाठी महत्वाच्या असलेल्या कामांचा समावेशही दुसऱ्या टप्प्यात आहे. या कामासाठी निधीची उपलब्धता व्हावी यासाठी श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी नुकतीच गोयल यांची भेट घेतली. लवकरच फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही सुरू केले जाणार आहे. रिमॉडेलिंग प्रकल्पामुळे कल्याण स्थानकात विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे सहा नव्या फलाटांची भर पडणार असून 13 फलाट उपलब्ध होणार आहेत. स्वतंत्र मार्गिकांमुळे मालवाहतूक, लोकल आणि एक्स्प्रेस अशी विभागणी करता येणे शक्य होणार आहे. परिणामी गाड्यांचा थांबा वेळ कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मालवाहतूक मार्गीकांच्या शेडचे अद्ययावतीकरण यात केले जाणार आहे. सोबतच पत्री पुलाला समांतर अशा एका नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम यात समाविष्ट आहे. पत्री पुलाचाही विस्तार केला जाणार आहे. तीन नवे पादचारी पूल या प्रकल्पात उभारले जाणार असून जुन्या आणि नव्या पूलांना जोडण्यासाठी या पुलांचा वापर होईल. त्यासह सुविधा इमारतही बांधली जाणार आहे. या कामाला रेल्वे प्रशासनाकडून गती देण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. येत्या दोन ते अडीच वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading