कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच होणार सुरूवात

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच सुरूवात होणार असून प्रत्यक्ष मार्गिका उभारणी आणि मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कल्याण येथील एका लोकार्पणकार्यक्रमात कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाला लवकरच गती प्राप्त होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीतच या मेट्रो मार्गिका आणि मार्गातील १७ स्थानकांच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाच्या १ हजार ५२१ कोटी इतक्या कोटींच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या ३० महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असूनलवकरच मेट्रो १२ प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला. मुंबईसह ठाणे आणि ठाणे पल्याड कल्याण- डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. याअंतर्गत ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असूनयात १७ स्थानके आहेत. या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीणभाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजाया स्थानकांचा समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading