जिल्ह्यातील ६० हिरकणी कक्षांपैकी पहिल्या कक्षाचा पडघा पोलिस ठाण्यात शुभारंभ

शासकीय कार्यालये, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या मुलांना खाऊ देणे आणि स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांचे सबलीकरण आणि बालकांचा विकास योजने अंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पहिला हिरकणी कक्ष ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस स्थानकाच्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. या हिरकणी कक्षाचे उद्घाटन पोलीस उपअधिक्षक जितेंद्र आगरकर यांच्या हस्ते आणि जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या उपस्थित करण्यात आले. जिल्ह्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, गर्दीच्या शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त हजारो महिला त्यांच्या बालकांसोबत प्रवास करीत असतात. या महिलांना त्यांच्या बालकांना खाऊ देणे आणि स्तनपान करणेसाठी सुरक्षित जागा नसल्याने बालकांना स्तनपान / खाऊ देण्यास अडचणी येत होत्या. ही अडचण सोडविण्यासाठी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीकडे महिलांना त्यांचे बालकांना स्तनपानासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यानुसार ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ६० हिरकणी कक्ष तयार करण्यात येणार असून जिल्ह्यातील पहिला हिरकणी कक्ष पडघा पोलीस स्टेशनमध्ये सुरु झाला आहे. या कक्षात स्वच्छ सूर्यप्रकाश, मोकळी हवा, पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्यासाठी वॉटर प्युरीफायर, बालकांसाठी खेळणी, मनोरंजनासाठी टीव्ही संच, एकाच वेळी दोन महिलांकरिता स्वतंत्र बेड, जनरेटर, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरा अशा सोयी पुरविण्यात आलेल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading