ओबीसी एकत्र आले तर देशाचा पंतप्रधान ठरवतील – जितेंद्र आव्हाड

ओबीसी हा जात समूह कधीच एकत्र येत नाही. सुमारे 54 टक्के लोकसंख्या असलेला हा वर्ग जर एकत्र आला तर या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतो; आरक्षणाचे विरोधक कोण, आणि समर्थक कोण याची जाणीव ठेवून ओबीसींनी राजकीय भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने सावित्री माई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल येथे करण्यात आले होते. त्यावेळी आव्हाड बोलत होते. यावेळी पत्रकार रुपाली बिडवे, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक पटकावणारी वैशाली तांडेल, घाडगे दाम्पत्य, विक्रीकर सहआयुक्त तनुजा मस्करे, वनाधिकारी गिरीजा देसाई, सरकारी वकील रेखा हिवराळे यांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सावित्रीमाई आणि जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्याचा सर्वाधिक फायदा विशिष्ठ जातीच्या महिलांनीच घेतला. पण, सावित्रीमाईंना याच वर्गाने विरोध केला होता, हे विसरता कामा नये. सत्यशोधक समाज फुलेंनी स्थापन केला. पण, या दाम्पत्याने जी बिजे रोवली त्याचे आज वटवृक्ष झाले आहेत. मागासवर्गीयांच्या आरक्षणाची भाषा सर्वात आधी कोणी केली असेल तर ती महात्मा फुलेंनी. देशामध्ये आपली संख्या 54 टक्के आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आपण एक झालो तर या देशाचा पंतप्रधान आपण ठरवू. पण, आपण एकत्र होतच नाही. आपणाला मनुवादाचा स्पर्श व्हायला लागला आहे. आपणही नको त्यांच्या मागे लागलो आहे.ज्यांनी सावित्रीमाई- जोतिबांना, बाबासाहेब, शाहू यांना सन्मान दिला नाही. ते आपल्याला काय सन्मान देणार? म्हणून आरक्षण गरजेचे आहे. आरक्षणामुळेच आपला समाज पुढे जाईल. खाईत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आधार आरक्षण आहे. पण, तेच आता काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर आरक्षण टिकवू शकलो नाही; तर, पुढचा काळ कठीण आहे. या काळापासून वाचण्यासाठी आपणाला संविधान वाचविण्याची शपथ घ्यावी लागेल. संविधान आहे म्हणून आपण आहोत, हे ध्यानात ठेवा, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading