एमएमआरडीए प्रकरणात समिती न नेमल्यास सोमवारपासून उपोषण करण्याचा विरोधी पक्षनेत्यांचा इशारा

येत्या सोमवारपर्यंत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती न नेमल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे. एमएमआरडीएने दिलेल्या घरांचे वाटप करताना भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी पठाण यांनी केली होती. त्यावर येत्या सोमवारपर्यंत निर्णय न घेतल्यास सोमवारी दुपारपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा शानू पठाण यांनी दिला आहे . दिव्यामध्ये एमएमआरडीएमार्फत महापालिकेला दोस्ती रेंटल मध्ये सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात पी.ए.पी.च्या लाभार्थ्यांना सदनिका मिळणे क्रमप्राप्त असताना या सदनिकांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या सदनिका देताना खोटी दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सर्व्हे, बनावट कॉम्प्युटर चाव्यांचा घोळ मोठया प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे यामध्ये महापालिकेच्या अधिका-यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे अशाप्रकारे गैरप्रकार झाला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. यासंदर्भात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सद्यस्थितीत वास्तव्य करीत असलेल्या सदनिकाधारकांवर त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी डायघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७-२०१८ पासून आजमितीपर्यंत मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती अंतर्गत रस्ता रुंदीकरणामध्ये एकूण किती इमारती तोडण्यात आल्या, त्यामध्ये किती सदनिका होत्या आणि त्यांचे क्षेत्रफळ, या सदनिकांना मालमत्ता कर आणि पाणी कर बसविण्यात आलेला होता का? आजमितीपर्यंत किती विस्थापितांचे पुर्नवसन करण्यात आले आहे आणि किती विस्थापितांचे पुर्नवसन अद्याप करणे शिल्लक आहे हे जाहीर करावे, तसेच, महापौर, पदाधिकारी आणि आयुक्तांची एक चौकशी समिती गठीत करावी आणि समितीचा अहवाल आगामी सर्वसाधारण सभेसमोर सादर करावा, अशी मागणी  शानू पठाण यांनी केली होती. मात्र, त्याबाबत आयुक्तांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पठाण यांनी पुन्हा एकदा आयुक्तांना स्मरणपत्र दिले आहे. येत्या सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत समिती जाहीर केली नाही तर पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा शानू पठाण यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading