आठ तास शांत झोप आणि निसर्गाशी सलगी हाच आरोग्याचा मूलमंत्र – डॉ. शेखर कुलकर्णी

निसर्गाशी सलगी ठेवणारी जीवनशैली आत्मसात केल्यास आरोग्य समस्या भेडसावणार नाहीत असा सल्ला डॉ. शेखर कुलकर्णी यांनी दिला. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत जीवनशैली आणि आरोग्य यातील संबंध उलगडून दाखवताना त्यांनी हा सल्ला दिला. पूर्वी मानव गुहेत रहायचा, शिकार करायचा आणि अंधार झाला की गुहेत परतायचा. या जीवनशैलीला अपेक्षित मानवी शरीराची रचना होती. मात्र उत्क्रांती होत गेल्यावर आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. माणसाच्या राहण्या-खाण्याच्या सवयी बदलल्यानं आरोग्य समस्या निर्माण झाल्या. हजारो वर्षापूर्वी सापडलेल्या मानवाच्या कवट्यांमध्ये किडलेले दात आढळून आले नाहीत. पण आता प्रत्येकाला दाताची समस्या भेडसावत आहे असा दाखला देत त्यांनी खाण्याच्या सवयींवर टीका केली. चांगले आरोग्य राखण्यासाठी झोपेचं महत्व त्यांनी विषद केलं. रोज रात्री ८ तास शांत आणि निर्मळ झोप आवश्यक आहे. झोपताना अंधारच हवा. कृत्रिम प्रकाशामुळे छातीचा कर्करोग निर्माण होऊ शकतो. झोपताना गडबड गोंधळ नको, झोप येत नसेल तर गरम पाण्याने आंघोळ करा अशा सूचना त्यांनी दिल्या. ताप येत असेल तर लगेच औषधं घेऊ नयेत, अँटीबायोटिक्स मुळे शरीराची हानी होते असं त्यांनी सांगितलं. निसर्गाशी मैत्री करा, विनोदबुध्दी ठेवा, कशावर तरी श्रध्दा ठेवा, श्रध्देनं माणसं बरी होतात. शरीर संकेत देत असतं हे संकेत ओळखून तपासणी केली तर रोग हाताबाहेर जाणार नाहीत. वेळ मिळेल तसं अनवाणी चाला असा सल्लाही शेखर कुलकर्णी यांनी यावेळी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading