एका महिलेकडून अपहृत २ वर्षीय बालिकेची अवघ्या २४ तासात पोलीसांनी केली सुटका

आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत एका अपरिचित महिलेला घरात दिलेला आसरा मुंब्र्यातील एका कुटुंबाला चांगलाच महागात पडला असून त्यांच्या २ वर्षीय बालिकेची अपहृत महिलेकडून अवघ्या २४ तासात पोलीसांनी सुटका केली. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ठाणे पोलीसांसह यवतमाळ पोलीस, पुणे रेल्वे पोलीस आणि पनवेल रेल्वे पोलीसांच्या विविध पथकांचे २४ अधिकारी आणि २३० पोलीस कर्मचारी २४ तास झटत होते. मुंब्र्यातील बैतुल शेख यांचा मुलगा असीफ त्यांना भेटण्यासाठी जळगावहून ठाण्यात येत होता. तेव्हा कल्याण येथे अंजली जाधव ही महिला जीव देण्याचा प्रयत्न करत होती. तिला असीफनं अडवून जीव  देण्यापासून परावृत्त केलं. घरच्यांनी हाकलून दिल्याचं सांगितलं असीफनं तिला मुंब्र्यातील आपल्या घरी नेलं. शेख कुटुंबाकडे अंजली जाधव मुलीप्रमाणे राहू लागली. ३ सप्टेंबर रोजी मायलेकांमध्ये भांडण झाल्यानं आई आणि मुलगा विभक्त राहू लागले. ३ ऑक्टोबर रोजी असीफनं आपल्या दोन वर्षाच्या मुलीला आईकडे राहण्यास पाठवले होते.  ऑक्टोबरच्या रात्री अचानक नात रडू लागल्यानं अंजलीकडे ५ रूपये देत तिला खाऊ आणण्यासाठी बाहेर पाठवलं. याच संधीचा फायदा घेत अंजलीने चिमुकलीला घेऊन पळ काढला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेनं समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अविराज कु-हाडे यांना अंजली जाधव बालिकेला साता-याला घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक पथक साता-याला रवाना झालं. पथक तिथे गेल्यावर अंजली यवतमाळ मधील दारवा येथील दोन-तीन लोकांच्या संपर्कात असल्याची बाब पुढे आली. या व्यक्तींना पांढरवाडा पोलीसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून अंजली जाधवचा फोटो मिळवून शोधमोहिम सुरू केली. त्यावेळी अंजली जाधव पुणे-भुसावळ पँसेजरने पुण्याला निघाल्याचं समजलं. त्यानुसार सहा पथकांद्वारे अथक प्रयत्न करून तिला पनवेलमध्ये अटक करून बालिकेची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या उपस्थितीत बालिकेला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading