आशर डेव्हलपर्सने दंडाची रक्कम न भरल्यास गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

ठाण्यातील नामवंत विकासक संस्था असलेल्या आशर डेव्हलपर्सने गृहनिर्माण प्रकल्प उभारतांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या तक्रारी नंतर ठाणे महापालिकेने 10 महिन्यांपूर्वी 4 लाखांची दंड वसुली करण्याची नोटीस पाठविली मात्र अद्याप दंडवसुलीची रक्कम वसुल न झाल्याने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आशर डेव्हलपर्स कंपनीने वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात प्रभाग क्र 17, रस्ता क्र. 16 येथे गृहनिर्माण इमारतीचे बांधकाम सुरू असताना कोणतीही परवानगी न घेता ३ ठिकाणांवरील गटारावरील स्लॅब तोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं 4 जुलै 2017 रोजी रायलादेवी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. अखेर या पाठपुराव्याला यश येऊन ठाणे महापालिकेने आशर डेव्हलपर्स कंपनीला 22 मार्चला 4 लाखांचा दंड भरण्याची नोटीस बजावली. आशर डेव्हलपर्स कंपनीने हा दंड वाजवी पेक्षा जास्त असल्याचे 26 एप्रिलला ठाणे महापालिकेला पत्र पाठविले आणि दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. परंतु हा दंड योग्य आहे तो भरावाच लागेल असे ठाणे महापालिकेने 18 मे रोजी कळवून सुद्धा आशर डेव्हलपर्सने हा दंड अजूनही भरलेला नाही. पालिका प्रशासनानेही स्मरण पत्रे त्यानंतर पाठविली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वेळोवेळी या संदर्भात निवेदन देऊन पाठपुरावा सुरू ठेवला आहे आणि दंड न भरत असल्यास गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading