आरोग्यमय दिवाळी साजरी करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला संयम आणि नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग काही प्रमाणात रोखण्यास आपण सर्वजण यशस्वी होत आहोत; परंतु या विषाणूचा धोका अजून पूर्णतः टळलेला नाही. आपले दुर्लक्ष अथवा बेजबाबदारपणा कोरोनावाढीस कारणीभूत होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. तुम्ही सर्वजण खबरदारी घ्या जबाबदारी आम्ही घेतली आहे. गेली आठ महिने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा आपल्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्यावरचा ताण वाढू न देणे आपल्या हातात आहे. घरातच राहून सुरक्षितरीत्या दिवाळी साजरे करणे याला सर्वांनी प्राधान्य द्यावे. दिवाळी सणात फटाक्यांच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. कारण कोरोनाचा विषाणू हा फुफ्फुसावर मारा करीत असतो, त्यामुळे कोरोनाबाधित आणि कोमॉर्बिड लोकांना या धुराचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याने मोठ्या आवाजाची व प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा. तसेच फटाके फोडताना लहान मुलांची काळजी घेण्यात यावी आणि सॅनिटाईजर हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांजवळ सॅनिटाईजरचा वापर करू नये. दिवाळीचा सण आनंदात, उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. जेणेकरून दिवाळी सणाच्या दिवसात मास्कचा वापर करून स्वतःसोबत इतरांच्याही आरोग्याच्या रक्षणाची जबाबदारी घ्या असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading