आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणेकरांसाठी उभारलेल्या ऑक्सीजन प्लांटचं येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. कोरोनाचे संकट पाहता, दहीहंडी गर्दी करून मोठ्या प्रमाणात साजरी न करता त्याऐवजी जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी हा प्लांट उभारण्यात आला आहे. मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असून त्या दिवशी उत्सवाचे मोठे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टने वर्तकनगर येथील विहंग पाम क्लब मध्ये हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी प्रशिक्षित ऑपरेटर, कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या प्लांटमधून १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन सिलेंडर विनामूल्य उपलब्ध होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. हा ऑक्सिजन प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची योजना आहे. आता डेल्टा व्हेरिएंटचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी स्वतः पुढाकार घेत हा प्लांट उभारण्याचे काम केले आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिटलनाही केला जाईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading