आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचे हजेरी बुक सांभाळावे शिवसेना नगरसेवकांचा टोला

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू असून त्यांना पिंक बुक बघण्याचा सल्ला देण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आनंद परांजपे यांना जे हजेरी पुस्तक देऊन पदावर बसवले आहे, ते त्यांनी सांभाळावे, असा जबरदस्त टोला शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांनी लगावला. खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन थयथयाट करत श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. या आरओबीला मी खासदार असताना मंजुरी मिळाली असून खासदार शिंदे यांनी रेल्वेचे पिंक बुक बघावे, असा अनाहूत सल्ला परांजपे यांनी दिला होता. त्याचा खरपूस समाचार महापालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती योगेश जानकर, नगरसेवक विकास रेपाळे आणि उमेश पाटील यांनी शुक्रवारी घेतला. पुलाला मंजुरी २०१२मध्ये मिळाली, परांजपे २०१४ पर्यंत खासदार होते; मग प्रत्यक्ष कामाला का सुरुवात झाली नाही, असा खणखणीत सवाल जानकर यांनी उपस्थित केला. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर करण्याचे काम शिंदे यांनी केले. मफतलाल कंपनीच्या जमिनीचे अधिग्रहण असेल, या पुलामुळे बाधित होणारे खारेगाव मैदान वाचवण्याचे काम असेल, या सर्व अडचणी दूर करून २०१६ मध्ये कामाला सुरुवात झाली आणि आज हे काम पूर्ण होत आहे. मुलाला नुसतं जन्माला घालून चालत नाही, त्याचं संगोपनही करावं लागतं, हे परांजपे यांना ठाऊक नाही. त्यांची पद्धत म्हणजे मूल जन्माला घालायचं आणि दुसऱ्याच्या मेहनतीने आयएएस-आयपीएस झाल्यावर माझं मूल म्हणून कौतुक करून घ्यायला धावायचं, असा जबरदस्त टोला रेपाळे यांनी हाणला. महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या मिशन कळवाची दिलेली हाक झोंबल्यामुळे परांजपे यांनी कमिशन टीएमसी ही मोहीम राबवण्याची धमकी दिली होती. त्याचाही समाचार या नगरसेवकांनी घेतला. मुंब्र्यातील मित्तल टीडीआर घोटाळ्याबाबत पत्र दिल्यानंतर परांजपे गप्प का झाले? मुंब्र्यात खासगीकरणाच्या माध्यमातून स्वच्छता व्हावी, म्हणून महापालिकेत कोण कुठल्या कुठल्या टेबलवर फिरत होतं, कौसा रुग्णालयाचा खर्च कसा वाढला, याचीही उत्तरं परांजपे यांनी द्यावीत, हेही कमिशन टीएमसीच होतं का, हे त्यांनी सांगावं, असा सवाल जानकर यांनी विचारला. आनंद परांजपे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले ते शिवसेनेच्या पुण्याईवर आणि शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे. ते आनंद परांजपे म्हणून किंवा दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव म्हणून निवडून आले नव्हते. सामान्य शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून त्यांना विजयी केलं. परांजपे यांनी आता ठाणे महापालिकेतील कुठलाही वॉर्ड निवडावा आणि महापालिका निवडणुकीला उभं राहावं. त्यांच्यासमोर सामान्य शिवसैनिकाला आम्ही विजयी करून दाखवू, असं आव्हानही रेपाळे, जानकर आणि उमेश पाटील यांनी दिलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading