आठ महिन्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ दिव्यांगांचं बेमुदत उपोषण

आठ महिन्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनापासून शबनम रैन यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. गतिमंद मुलाच्या दिव्यांग दाखल्यासाठी गेलेल्या शबनम यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि अधिकार्‍यांकडून मारहाण होण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सहा सुरक्षा रक्षकांसह पुरावे नष्ट केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु ८ महिने उलटूनही पोलीसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शबनम आणि इतर दिव्यांग व्यक्तींना उपोषणाचा इशारा दिला आहे.
मुंब्रा येथे राहणार्‍या शबनम रैन यांचा मुलगा मोहम्मद नावेद हा गतीमंद आहे. शबनम यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मुलाचा सांभाळ करणे त्यांना अशक्य होत असल्याने शासकीय मदत मिळावी, या हेतूने त्या कळवा रुग्णालयामध्ये फे-या मारत होत्या. नावेदच्या वैद्यकीय तपासणीत तो 100 टक्के गतिमंद असल्याचे स्पष्ट झाल्याने नोव्हेंबर 2020 मध्ये त्या आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात दाखला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी अशोक गढरी यांनी त्यांच्याकडे पाल्याचा जन्मपत्र, शिधापत्रिका, वीज बिल, घराचा भाडेकरार आदी कागदपत्रांची मागणी केली.
यावर आवश्यक ती कागदपत्रं सादर करूनही गढरी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता शबनम रैन यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. या प्रकाराचे शबनम यांनी चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला असता गढरी यांच्या सांगण्यावरुन उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक नरेंद्र पगारे, सुप्रिया नाईक, अश्विनी यादव, राहूल जाधव, गणेश पाटील, अमूल कराळे यांनी शबनम रैन यांना मारहाण केली. या संदर्भात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस उपनिरीक्षक गिरीश यादव यांनी मोबाईलमधील चित्रिकरण नष्ट केले. त्यानंतर शबनम रैन यांनी सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यामध्येही रैन यांना मारहाण झाली असल्याचे स्पष्ट दिसत होते. अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे नेते मोहम्मद खान यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. सुनावणीनंतर या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. परंतु आरोपींना अटक न करण्यात आल्याने शबनम रैन यांच्यासह अनेक दिव्यांगांनी शनिवारपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading