अहमदाबाद महापालिकेनं ५० नोटीसा बजावलेल्या एका जाहिरात कंपनीला १ कोटी २० लाख रूपये देण्याच्या प्रस्तावाला संजय वाघुलेंचा आक्षेप

अहमदाबाद महापालिकेनं ५० नोटीसा बजावलेल्या एका जाहिरात कंपनीला महापालिकेनं पायघड्या पांघरल्या असून या कंपनीला पुढील १५ वर्षाच्या काळात १ कोटी २० लाख रूपये देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला आहे. जाहिरात विभागाचं संपूर्ण काम ऑनलाईन, जाहिरात फलकांच्या परवानगीसाठी संगणक प्रणाली आणि शहरातील जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचं काम एका जाहिरात कंपनीला देण्याचा प्रस्ताव प्रशासनानं तयार केला आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीनं अहमदाबाद महापालिकेत काम केलं. त्यामुळं अहमदाबाद महापालिकेचं उत्पन्न ४ वर्षात १४८ कोटी रूपयांनी वाढल्याचा दावा या कंपनीनं केला. त्यानुसार या जाहिरात कंपनीला लोकसहभागातून काम सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्याकरिता १५ लाख रूपये, ऑनलाईन संगणक प्रणाली तयार केल्यानंतर १० लाख रूपये आणि देखरेख आणि अहवालासाठी दरमहा १० लाख रूपये तसंच पुढील १५ वर्षासाठी प्रतिवर्षी ५ टक्के वाढीनं रक्कम दिली जाणार आहे. तसंच वाढीव महसुलाच्या रक्कमेवर १० टक्के वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. महापालिका कंपनीला ५०० चौरस फूटाची जागा देणार आहे. या प्रस्तावानुसार कंपनीच्या तिजोरीत दरसाल १ कोटी २० लाख रूपये जमा होणार आहेत. मात्र या कंपनीला अहमदाबाद महापालिकेनं तब्बल ५० वेळा नोटीसा बजावल्याचा दावा संजय वाघुले यांनी केला आहे. अहमदाबाद महापालिकेच्या महसुलात कोणतीही वाढ न झाल्याचं अधिका-यांचं म्हणणं आहे. अहमदाबाद महापालिकेनं या कंपनीला १ कोटी ६७ लाख रूपयांहून अधिक रक्कम दिली आहे. एकूणच या कंपनीकडून महापालिकेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप संजय वाघुले यांनी केला असून या कंपनीच्या एकूणच प्रस्तावावर आक्षेप घेतला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading