अनेक पादचारी पूल वापराविना असताना नवीन तीन पूलांच्या अट्टाहासावर भारतीय जनता पक्षाचा आक्षेप

घोडबंदर भागात मेट्रोची कामे सुरु असल्याने तेथील पादचारी पुल काढण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. परंतु असे असतांनाही या भागात दोन आणि कॅडबरी सिंघानिया शाळेजवळ एक असे तीन पादचारी पुल उभारण्याचा घाट घातला जात आहे. मुळात आधीच्याच पादचारी पुलांचा वापर होत नाही. त्यात आता पुन्हा १३ कोटींचा खर्च करुन काय साध्य होणार असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. यामागे सत्ताधारी शिवसेनेचा डाव असून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचा फंड गोळा करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी देखील घोडबंदर भागात विद्यापीठ, आर मॉल तसेच विवीयाना मॉल, आनंद नगर टोलनाका आदींसह इतर ठिकाणी देखील पादचारी पुल उभारण्यात आले आहेत. परंतु या पादचारी पुलांचा वापर अगदी नगण्य होतांना दिसत आहे. केवळ येथे असलेल्या मॉलसाठीच हे पुल उभारण्यात आल्याचे यापुर्वीही स्पष्ट झाले आहे. त्यात आता कॅडबरी जवळील सिघांनिया शाळेजवळ पावणे चार कोटींचा खर्च करुन पादचारी पुल उभारण्यात येत आहे. याचे भुमिपुजन नुकतेच महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर घोडबंदर भागातील कारमेल आणि पंचामृत या भागातही सुमारे ९ कोटींचा खर्च करुन दोन पादचारी पुल उभारण्याचा घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे हे पादचारी पुल काढून दुसरीकडे पुन्हा बसविता येतात असा दावा यापूर्वी महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे हेच पुल काढून नव्याने प्रयोजन करण्यात येत असलेल्या पादचारी पुलांच्या ठिकाणी बसवावेत जेणे करुन पालिकेच्या खर्चात देखील कपात होईल. मात्र तसे शक्य नसले तर नव्या पादचारी पुलांचा घाट बंद करावा अशी मागणी डुंबरे यांनी केली आहे. एकीकडे कोरोनामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला आहे. उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालतांना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांना कात्री लावली आहे. दुसरीकडे शहरातील सार्वजनिक शौचालयांना कडी कोयंडा नाही, त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. असे असतांना त्यासाठी निधी खर्ची करण्याचे सोडून नको त्या प्रकल्पांवर खर्च कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ही उधळपटटी बंद करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.महापालिका प्रशासनाला हाताशी धरुन सत्ताधारी शिवसेना केवळ आगमी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या माध्यमातून निवडणुकीचा फंड गोळा करीत असल्याचा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading