कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘महाशिवरात्री उत्सव’ साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर आणि आयुक्तांचे आवाहन

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी ‘महाशिवरात्री उत्सव’ अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवांपैकी एक मोठा उत्सव मानला जातो . देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानी तसेच इतर विविध ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी शिवभक्त दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. परंतू यावर्षी कोविडच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिरात मोठया प्रमाणात पूजाअर्चा केली जाते तसंच दर्शनासाठी अनेक भाविक गर्दी करतात. परंतू यावर्षी भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजाअर्चा करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सोशल डिस्टन्सींगचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त ५० भाविक दर्शन घेतील, यादृष्टीने संबंधित विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे नियमांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात हार आणि फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रशासनाने मंडपाबाबत दिलेल्या नियमांना अनुसरूनच महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्त मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वत: हून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेष्ठ नागरीक आणि लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरीता आणू नये, महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून देण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading