ठाण्यात सापडलेल्या रोकड प्रकरणात एका पोलीस अधिका-यासह ४ पोलीसांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर येथील पुष्पांजली या इमारतीतील एका सदनिकेतून ५३ लाख ४६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. ऐन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एवढी मोठी रोकड एकाच ठिकाणी सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्यावेळी ही रोकड राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची असल्याचं चर्चिलं गेलं होतं. रमेश कदम हे जे जे रूग्णालयातून ठाणे कारागृहात येत असताना पुष्पांजलीमधील राजू खरे यांच्या घरी नेण्यात आलं होतं. तेव्हा पोलीसांनी अचानक धाड टाकून ही रोकड हस्तगत केली होती. वैद्यकीय चाचण्या आटपून ठाणे कारागृहात येत असताना त्यांच्यासोबत ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक रोहिदास पवार, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विलास गायकवाड होते. कदम यांना थेट रूग्णालयातून कारागृहात आणणं गरजेचं असताना कदम यांच्या सांगण्यावरून त्यांना मित्राच्या घरी नेल्याप्रकरणी रोहिदास पवार यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर दिलीप चव्हाण, दत्तू खेताडे, उत्तम कांबळे आणि विलास गायकवाड यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केलं आहे.