पालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकीकडे महापालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांच्या विरोधात आंदोलनं छेडली जात असताना दुसरीकडे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड मात्र पालिका आयुक्तांची पाठराखण करत आहेत. महापालिकेतील थीम पार्क, बॉलिवूड पार्क मधील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं गदारोळ उडवून दिला होता. हिरानंदानी इस्टेट मधील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावावरूनही विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी हा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. परिवहन सेवेच्या दीडशे बसेसच्या दुरूस्ती प्रस्तावावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार आवाज उठवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनं या विरोधात आंदोलनही केलं होतं. एकीकडे पक्षातर्फे विविध स्तरावर आंदोलनं आणि आरोपांची राळ उडवून दिली जात असतानाच दुसरीकडे पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पालिका आयुक्तांची तरफदारी केली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची पालिका आयुक्तांबाबत दुटप्पी भूमिका असल्याचं दिसत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading