NEET आणि JEE च्या परीक्षा ऑनलाईन किंवा असाईनमेंटच्या स्वरूपात घेण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

NEET आणि JEE च्या परीक्षा ऑनलाईन किंवा असाईनमेंटच्या स्वरूपात घ्याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. उदय सामंत यांना एक पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे.
कोरोनाच्या संकटात NEET व JEE अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असा सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला. परंतू कोरोनाच्या पार्श्वभुमीवर NEET व JEE अंतिम वर्षांच्या परीक्षा कोणत्या स्वरूपात घ्याव्यात? याचा निर्णय शासनाकडून होत नसल्यामुळे विद्यार्थी गेले ३ महिने मानसिक दबावाखाली होते. सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना शासनाच्या नियमानुसार परिक्षा घेण्यासंदर्भातला हा निर्णय अन्यायकारक आहे असे विद्यार्थ्यांचे मत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून कॉलेजमध्ये अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेले नाही. अभ्यासाशी संपर्कच तुटला असून शिक्षकांकडून अभ्यासातील शंकांचे निरसन सुद्धा करता आलेले नाही. तसेच कोविडच्या काळात थेट परिक्षा केंद्रावर जावून मास्क आणि हँड ग्लोव्हज घालून परीक्षा द्यावी लागणार आहे. अश्या परिस्थितीत परिक्षा घेतल्यास विद्यार्थी नापास होण्याची शक्यता जास्त आहे. एवढे करूनही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होवू शकतो. त्यामुळे बनारस हिंदू युनिवर्सिटी तसेच मध्यप्रदेश सरकारने सर्व विद्यार्थ्यांना असाईनमेंट घरी सोडवायला दिल्या असून असाईनमेंट ई-मेल, व्हाट्स अप्प द्वारे पाठवून नंतर त्या जवळच्या सेंटरवर जमा करायला किंवा कुरिअरने पोच करायला सांगितल्या आहेत. त्याच धर्तीवर सरकारने ऑनलाईन किंवा असाईनमेंट स्वरूपात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाची आणि परिक्षेत नापास होण्याची भिती न राहता मानसिक दडपण येणार नाही असं प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading