समूह विकास योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्याचा महापालिकेचा खुलासा

ठाणे महापालिकेच्या समूह विकास योजनेतील ६ आराखड्यांना राज्य शासनानं मंजुरी दिली असून या योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत असल्याचा खुलासा महापालिकेनं केला आहे. शहरातील मोठ्या प्रमाणावर जुन्या धोकादायक इमारती, अनधिकृत इमारती, झोपडपट्टी यामुळं शहराची सुनियोजित आणि सुनियंत्रित पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीनं समूह विकास योजना हाती घेण्यात आली आहे. शहरातील ४४ नागरी पुनरूथ्थान आराखड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी कोपरी, हजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर आणि राबोडी परिसराची प्राधान्यानं निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळं ठाणेकरांना परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत. या योजनेत अस्तित्वातील भोगवटाधारकांना जरी ते अनधिकृत बांधकामात वास्तव्य करत असले तरी त्यांच्या राहत्या घराइतके घर पुनर्विकासात मिळणार आहे. ही योजना भूखंडधारक, भोगवटाधारकांची गृहनिर्माण संस्था यामार्फत राबवली जाणार आहे. किसननगर येथील नागरी समूह योजनेतील रहिवाशांकरिता हजुरी येथील रेंटल योजनेमधील ४६२ घरं दिली जाणार असून तेथील बाधितांचे स्थलांतरण या संक्रमण शिबीरात टप्प्याटप्प्यानं करून इमारतींचं बांधकाम करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading