स्मार्ट मीटर्सची योजना बंद करून भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याची भारतीय जनता पक्षाच्या नारायण पवारांची मागणी

ठाणे महापालिकेनं नळ जोडण्यांवर बसवलेले नवे कोरे मीटर्स बंद पडले असून स्मार्ट मीटरची ही योजना तातडीनं बंद करून ठाणेकरांचे ११० कोटी रूपये वाचवावेत तसंच या भ्रष्टाचाराची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील विविध नळजोडण्यांवर पाणी मीटर बसवण्यासाठी १२० कोटी रूपयांची योजना तयार केली. शहराच्या हिताच्या दृष्टीनं ही योजना सुरू करण्यात आली. मात्र संबंधित एजन्सीने केवळ पैसे कमावण्यासाठीच पाणी मीटर योजनेची अंमलबजावणी सुरू केल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला आहे. शहरामध्ये २८ हजार मीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये नियमांना डावलून ५ हजाराहून अधिक झोपडपट्ट्यांनाही मीटर लावण्यात आले आहेत. आत्तापर्यंत या कंपनीला पावणे सात कोटी रूपये देण्यात आले असून आणखी ५ कोटींचं बील तयार आहे. या मीटर प्रकरणात ठाणेकरांचे जवळपास १० कोटी रूपये पाण्यात गेले आहेत. उर्वरीत ११० कोटी रूपये वाचवण्यासाठी स्मार्ट मीटर योजना बंद करावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. नव्यानंच लावण्यात आलेले मीटर्स काही ठिकाणी बंद पडले आहेत. काही महिन्यात मीटर आणि कंत्राटाची मुदत संपल्यानंतर कंपनी निघून गेल्यावर दुरूस्तीचा खर्च कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading