पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या आरोपींना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या आरोपींना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलीसांना यश आलं आहे. तुषार कोठारी आणि त्यांचा मित्र काशिमीरा येथील शांती विद्यानगरी बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये राहणा-या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले होते. मैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना फ्लॅटमध्ये अचानक तीन अनोळखी इसमांनी प्रवेश केला. त्यापैकी दोघांनी स्वत:ची ओळख पोलीस तर तिस-याने स्वत:ची ओळख मानवी हक्क आयोगाचा सदस्य अशी करून दिली. त्यानंतर या तीन इसमांनी तुषार कोठारी आणि त्यांच्या मैत्रिणीला बेडरूममध्ये नेऊन धमकावून त्यांचे फोटो काढण्यास भाग पाडले आणि त्यांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची तसंच पोलीसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तुषार कोठारी आणि त्यांचा मित्र आणि मैत्रिणीने या तिघांना तसे काही न करण्याची विनंती केली त्यावेळी या तिघांनी तुषार कोठारीकडे २ लाखांची मागणी केली. त्यांच्याकडील २८ हजार रूपयांची रोकड आणि १ लाख ७० हजार रूपयांचा बँक चेक जबरीनं घेतला. या फ्लॅटमधील सीसीटीव्ही फूटेज तसंच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीसांनी अयुब खान, राघवेंद्र उर्फ हनुमंत औटगिरी, प्रेम सिवन आणि त्यांच्या साथीदारांनी संगनमत करून हा प्रकार केल्याचं उघडकीस आणले. राघवेंद्र औटगिरी याला याप्रकरणी अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading