प्रदूषणाबाबत महापालिकेनं नियमावली तयार केली असून या नियमांचे उल्लंघन करणा-यांना दंड केला जाणार

प्रदूषणाबाबत महापालिकेनं नियमावली तयार केली असून या नियमांचे उल्लंघन करणा-यांना दंड केला जाणार आहे.
वाढती बांधकामे आणि वाहन संख्या यांच्यामुळे शहरातील धुळ प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. स्वच्छ हवा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत ठाणे महापालिका स्तरावर नुकताच आढावा घेण्यात आला. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी नियमावलीच्या पालनाबद्दल निर्देश दिले. तसेच पायाभूत सुविधांची विविध कामे करत असताना धुळ प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्यास पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल असे स्पष्ट केले. ठाणे शहरातील विकासक, आरएमसी प्लांटचे चालक, रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार, मेट्रो रेल्वेचे प्रतिनिधी आदी या बैठकीस उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी उपस्थितांना ठाण्यातील हवेच्या प्रदूषणाबाबत माहिती दिली. तर प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाचे दक्षता पथक तयार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अनघा कदम यांनी सांगितले.
इमारतीचे बांधकाम करताना बांधकामाभोवती सर्वत्र बॅरिकेडिंग करणे. इमारतीचे प्लास्टर करताना संरक्षक जाळी लावणे. बांधकामाच्या वेळी डेब्रिज टाकण्यासाठी प्लास्टिक गार्बेज ड्रमचा वापर करणे आवश्यक आहे. रेती, माती आणि सिमेंट यामुळे होणारे धूळ प्रदूषण टाळण्यासाठी वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा. इमारतीच्या बांधकामासमोरील रस्त्याची धूळ कमी करण्यासाठी रेन गनचा वापर करणे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत. इमारतीचे बांधकाम करतेवेळी तोडफोड कचऱ्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून परवानगी घ्यावी. तसंच रस्ते खोदताना किंवा रस्ता दुरुस्तीचे काम करताना वॉटर स्प्रिंकलर्स/रेन गन स्प्रिंकलरचा वापर करणे. ज्या रस्त्याचे काम चालू आहे त्या रस्त्याच्या बाजूने बॅरिकेडिंग करणे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ट्रक ताडपत्रीने झाकलेले असावेत अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading