५०० चौरस फूटाच्या घरांना माफी देण्याचा प्रस्ताव म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात धूळफेक – संजय केळकरांचा आरोप

शिवसेनेने मागील निवडणुकीत  दिलेले घरपट्टी माफीचे आश्वासन आणि नुकताच त्याबाबत मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा आरोप भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी आणि पाण्याची वाढीव बिले या बाबत आमदार संजय केळकर यांनी काल ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. त्यावेळी करमाफीचा प्रस्ताव म्हणजे निव्वळ शिवसेनेची बनवाबनवी असल्याचे उघडकीस आल्याचे केळकर यांनी सांगितले.
शिवसेनेने मागील निवडणुकीत शहरातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचे आश्वासन ठाणेकरांना दिले होते. यास साडेचार वर्षे उलटली तरीही प्रत्यक्षात हे आश्वासन साकारता आले नाही, त्यामुळे शिवसेनेने मतांसाठी नागरिकांची केलेली ही फसवणूकच आहे, याची जाणीव ठाणेकरांना आहे. आगामी निवडणुकीत सर्वसामान्य मतदार त्यांना योग्य धडा शिकवतील, असा टोला केळकर यांनी हाणला आहे.
आयुक्तांशी झालेल्या चर्चेत करमाफी संदर्भात आणखी एक फसवा फसवी उघडकीस आल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी असे गोंडस नाव मंजूर प्रस्तावाला देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अशा घरातील रहिवाशांना पूर्ण करमाफी मिळणारच नाही. केवळ महापालिकेचा कर माफ होणार असून बिलात समाविष्ट असलेला शासनाचा सर्वाधिक कर ठाणेकरांना भरावाच लागणार आहे. निवडणुका तोंडावर आल्या असताना घेतलेला हा निर्णय म्हणजे ठाणेकरांना दिलेल्या या भूलथापाच आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा ठरावही अद्याप झाला नसल्याचे उघडकीस आले आहे. हा ठराव कधी तयार होणार, शासनाकडे कधी पाठवणार, त्याला मंजुरी कधी मिळणार? असे प्रश्न निर्माण झाले असून दुसऱ्या निवडणुकीत मतांसाठी शिवसेनेने पुन्हा एकदा त्याच आश्वासनाचे गाजर ठाणेकरांना दाखवल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.
ठाण्यात पाण्याचे दीड लाख ग्राहक असून अर्ध्याहून कमी ग्राहकांना पाण्याचे मीटर बसवण्यात आले आहेत. हे मीटर देखील सदोष असल्याने अवाजवी बिले निघत आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. हे मीटर बदलून नवीन निर्दोष मीटर बसवावेत, तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच पाणीपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. यास प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading