३१ मे पर्यंत नोंदणी करणाऱ्या घरेलू कामगारांना लाभ देण्याची संजय वाघुलेंची मागणी

राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन काळासाठी देण्यात येणारे लाभ येत्या ३१ मेपर्यंत नोंदणी करणाऱ्या घरेलू कामगारांना द्यावेत, अशी आग्रही मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. घरेलू कामगारांची बिकट आर्थिक स्थिती, अपुरे ज्ञान आदींचा सहानुभुतीने विचार करून नोंदणीसाठी वाढीव मुदत देऊन कामगारांना दिलासा द्यावा असे वाघुले यांनी म्हटले आहे. राज्य सरकारतर्फे घरेलू कामगार अधिनियमान्वये लाभार्थी म्हणून नोंद केलेल्या १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना राज्य सरकारकडून विविध लाभ दिले जातात. विशेषत: अपघात झाल्यानंतर लाभार्थींना साह्य, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, उपचारासाठी तरतूद, प्रसूतीसाठी मदत आदींबरोबरच मंडळाने निश्चित केलेले लाभ दिले जातात. तुटपुंजे उत्पन्न आणि हातावर पोट भरत असलेल्या हजारो घरेलू कामगारांना योजनेचा दिलासा मिळतो. कोविड आपत्तीमुळे गेल्या वर्षभरात बहुतांशी घरेलू कामगार महिलांना रोजगार न मिळाल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने घरेलू कामगारांना मदत करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी वाघुले यांनी केली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी राज्य सरकारने ३१ मार्च २०२१ ही मुदत ठेवली आहे. मात्र, घरेलू कामगारांची बिकट आर्थिक स्थिती, अपुरे ज्ञान, लॉकडाऊनमुळे गमावलेला रोजगार, कोरोना संसर्गाची भीती आदी मुद्द्यांचा विचार करता गेल्या वर्षभरात शेकडो महिला कामगारांना नोंदणी करता आली नाही. या परिस्थितीमुळे हजारो महिला नोंदणीपासून वंचित राहिल्या. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन नोंदणी सुरू केली. ठाण्यासह राज्यभरातील हजारो घरेलू कामगारांना लाभ देण्यासाठी ३१ मेपर्यंत नोंदणीची मुभा द्यावी अशी मागणी वाघुले यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading