१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मालमत्ता करात १० टक्के सूट

ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते सन २०२२-२३ या आर्थ‍िक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जून पर्यंत जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे,याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे उद्या १०.३० ते सायं ५.०० तसेच रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वितरीत करण्याचे काम प्रभागसमिती स्तरावरुन सुरू आहे. जे नागरिक १५ जूनपर्यत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १६ ते ३० जूनपर्यंत ४ टक्के, १ ते ३१ जुलै पर्यंत ३ टक्के तर १ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. कोणत्याही प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत जमा करु शकतील. तसेच या सवलत योजनेकरिता करदात्यांचा प्रतिसाद पाहता करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवारी आणि रविवारी कार्यान्वित राहणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading