स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

स्वयम् पुनर्विकास प्रक्रिया सुरू होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात बोलताना केलं. ठाणे हौसिंग फेडरेशनतर्फे स्वयम् पुनर्विकास याविषयी आयोजित मेळाव्यात फडणवीस बोलत होते. शासनाच्या मंजूर झालेल्या धोरणानुसार सोसायटीच्या सभासदांना वास्तुविशारद मकरंद तोरसकर यांनी पुनर्विकास आणि स्वयम् पुनर्विकासातील फरक आणि फायदे तोटे सांगितले. स्वयम् पुनर्विकासाच्या माध्यमातून संस्थांनी कामकाज केल्यास घराच्या वाढत्या किंमती कमी होतील आणि ग्राहकांना स्वस्तात घरं मिळतील. एक खिडकी योजना त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाहीर केलेल्या सवलती महापालिकेनं स्वयम् पुनर्विकास करणा-या संस्थांना उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करून त्याची पूर्तता करून घ्यायला हवी. खोट्या तक्रारी करणा-यांना न्यायालय सुध्दा दंड, शिक्षा करते. त्याच धर्तीवर अशा तक्रारदारांसाठी तरतूद करणं आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्था या व्यवसाय करणा-या संस्था नसून सेवाभावी संस्था आहेत. त्यांच्यासाठी सहकार कायद्यात स्वतंत्र प्रकरणाची तरतूद करून दिलासा देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेनं आम्हांला सत्तेत बसवले होते मात्र आम्हांला सत्तेत बसता आलं नाही. नव्यानं स्थापन झालेलं हे सरकार किती काळ टिकेल हे माहिती नाही मात्र तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गृहनिर्माण संस्थांसाठी त्रासदायक असणा-या जीएसटीबाबत आपण अर्थमंत्र्यांशी बोलून याविषयी मदत करू असं खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading