घरच्या जेवणास मज्जाव केल्याच्या रागातून एका कैद्यानं चक्क पोलीसांच्या अंगावर थुंकत त्याच्या करंगळीचा चावा घेतल्याचा प्रकार

घरच्या जेवणास मज्जाव केल्याच्या रागातून एका कैद्यानं चक्क पोलीसांच्या अंगावर थुंकत त्याच्या करंगळीचा चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. महम्मद मन्सुरी असं या कैद्याचं नाव असून त्याच्या इतर ८ न्यायबंदींना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून मुंबईतील दिंडोशी न्यायालयातील सुनावणीवरून परतत असताना ठाण्यात हा प्रकार घडला. मन्सुरी यानं पोलीस वाहनातच शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यानं त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या महम्मद मन्सुरीला दिंडोशी न्यायालयात नेऊन आणण्याची जबाबदारी खडकपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक सुधाकर कदम आणि त्यांच्या पथकावर सोपवण्यात आली होती. ही प्रक्रिया आटपून ठाणे कारागृहात परत येत असताना मन्सुरीच्या नातलगांनी त्याला घरच्या जेवणाचा डबा देण्याचा प्रयत्न केला. त्याला उपनिरिक्षक कदम यांनी आक्षेप घेत सर्व बंदिजनांना सरकारी भत्ता मिळतो असं सांगितल्यानं त्याचा राग मनात ठेवत मन्सुरीनं पोलीसांच्या वाहनामध्ये शिवीगाळ करून उपनिरिक्षक कदम यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसंच हे वाहन हरिनिवास सर्कलजवळ आलं असताना मन्सुरी हा पोलीस शिपाई विवेक काळे यांच्या अंगावर थुंकला. यावेळी भांडण करू नकोस असं समजावणा-या पोलीस शिपाई महेश ठाकूर याच्या उजव्या हाताच्या करंगळीचा चावा घेत स्वत:चे डोके वाहनाच्या जाळीवर आपटून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी मन्सुरीच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading