स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे आदेश दिले. स्मार्टसिटी अंतर्गत ठाणे पूर्व कोपरी ते ठाणे स्थानक परिसरातील पश्चिमेकडील सॅटीस प्रकल्पातील पूल हा वाहतूक सुनियोजित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून ठाणे स्टेशन पूर्व परिसरात जी बसेसची वाहतूक होते ती पूर्णत: स्वतंत्र करण्याचे नियोजन आहे. या पुलाचे काम नियोजित वेळेनुसार सुरू असून पुलाच्या बांधणीसाठी एकूण 58 खांब नियोजित असून या खाबांपैकी एकूण 48 खाबांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 9 खांबांचे काम सुरू असून त्यापैकी काही खांब हे शासकीय जागेत उभारावयाचे असून त्या जागेसंदर्भात संबंधित शासकीय आस्थापनांना पत्रव्यवहार करण्याचे आदेश देत सुरू असलेली प्रकल्प कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. हा पूल एका ठिकाणी रेल्वेला ओलांडून जात असल्यामुळे या ठिकाणचे बांधकाम हे सिमेंट काँक्रिटचे नसून मेटलमध्ये करण्यात येणार आहे, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करावा, सॅटिसचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून डिसेंबर 2023 पर्यत पूर्ण होणे नियोजित आहे. निर्धारित वेळेपूर्वीच हे काम पूर्ण होईल या दृष्टीकोनातून काम करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या. ठाणे शहराचा खाडीलगतचा परिसर सुंदर करुन नागरिकांना सुट्टीच्या दिवशी विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होईल या उद्देशाने खाडीकिनारा सुशोभिकरण प्रकल्प स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. ही सर्व कामे अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असून येत्या पाच महिन्यांमध्ये ही सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन केले आहे. ही कामे अधिक गतीने पूर्ण करुन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. ठाणे स्मार्ट सिटी व्यतिरिक्त इतर निधीतून सुरू असलेल्या एकूण चार प्रकल्पांचा आढावा यावेळी घेतला. या प्रकल्पामधील पूर्ण झालेल्या एलईडी पथदिवे, शाळेंच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पाची माहिती घेतली. शहरात 10 ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विकेंद्रीकरण प्रकल्पापैंकी 9 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित एक प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या नाल्याची कामे 31 जानेवारी 2023 पर्यत पूर्ण करण्यात यावीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरात सुरू असलेल्या एकूण 39 प्रकल्पांपैकी सद्यस्थितीत सुरू असलेल्या 14 प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. ठाणे – मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वेस्थानकाच्या कामकाजाचा आढावा देखील घेतला. शहरातील भुयारी गटार योजनांची कामे देखील वेळेत करण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात आतापर्यत एकूण ४०० पैकी 330 कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित 70 कॅमेरा जोडणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देत हाजुरी येथील इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर येथील व्हीएमएस आणि व्हीए या प्रणालीतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याची कामे देखील तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील नागरी सुविधा स्मार्टसिटीला साजेशा पद्धतीने विकसित होत आहेत याचा अनुभव नागरिकांना सुद्धा येईल अशा पद्धतीने कामे केली जावीत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.ठाणे पश्चिमेला असलेला सॅटीस प्रकल्प हा शहराला मानदंड ठरणारा आहे, या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले, यामुळे ठाणे पश्चिमेची वाहतुक कोंडी सुटण्यास मदत झाली. परंतु सद्य:स्थितीत या ठिकाणी अस्वच्छता आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होते त्यामुळे आपला उद्देश सफल होत नाही. याबाबत स्थानिक उपायुक्तांना सूचना देवून फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करुन संपूर्ण परिसर फेरीवालामुक्त आणि स्वच्छ राहिल यादृष्टीने ठोस कार्यवाही करावी असेही आदेश संबंधितांना दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading