सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीची जबाबदारीही पालिकेचीच – आमदार संजय केळकर

नागरिक वृक्ष कर भरत असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातील झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेचीच आहे असा आग्रह धरत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याने सोसायट्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोलबाड भागात गणेशोत्सव स्थळी पिंपळाचे मोठे झाड पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता तर चौघे जखमी झाले होते. हे झाड गृह निर्माण सोसायटीच्या अखत्यारीत असल्याने या झाडाची छाटणी करण्याची जबाबदारी सोसायटीचीच असल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. याबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. झाडांची छाटणी करण्याचा खर्च ठाण्यातील अनेक गृहसंकुलांना परवडत नाही. सोसायट्यांनी छाटणी केली तरी ती सदोष राहण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे नागरिक वृक्षकर भरत असल्याने सोसायटीअंतर्गत झाडांची छाटणी करण्याची जबाबदारीही आहे, अशी भूमिका केळकर यांनी मांडली. रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो आणि तो वायाही जातो, त्या तुलनेत झाडांच्या छाटणीसाठी जेमतेम एक ते दीड कोटींचा खर्च येतो. यात आणखी भर घालून सोसायटी अंतर्गत झाडांची छाटणी करण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी केली. या मागणीबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात गृहसंकुलांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या चार दिवसांत रस्ते आणि उड्डाणपूलांवरील खड्डे बुजवण्यात यावेत असे आमदार संजय केळकर यांनी ठणकावून सांगितले. आजपासून या कामास सुरुवात झाली असून उद्या या कामांची पाहणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. ठाण्यात बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर झाला असून अधिकारी यावर कारवाईबाबत स्वारस्य दाखवत नसल्याचे दिसून येत आहे. डायघर भागात तर बेकायदेशीरपणे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. अखेर न्यायालयानेच याबाबत पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत संजय केळकर यांनी याबाबत पाठपुरावा कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading