सेलिब्रिटींपेक्षा रिक्षा चालक हेच खरे स्वच्छता दूत – जिल्हाधिकारी

सेलिब्रिटींपेक्षा शहरातील नागरिकांना सेवा देणारे रिक्षा चालकच खरे स्वच्छता दूत असून थुंकू नका आणि थुंकू देऊ नका हा संदेश हे स्वच्छता दूत ठाण्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवतील असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिका, प्रादेशिक वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, रोटरी क्लब आणि शहरातील डॉक्टरांच्या सहकार्यानं ठाण्यात राबवण्यात येणा-या थुंकू नका आणि थुंकू देऊ नका या विशेष मोहिमेचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १२०० हून अधिक रिक्षा चालकांसह सफाई कामगारांनी सहभाग घेतला. थुंकू नका आणि थुंकू देऊ नका ही मोहिम फक्त रिक्षा चालकांपर्यंतच मर्यादित न ठेवता शहरातील सफाई कामगार, फेरीवाले, सामाजिक संस्था अशा सर्वांच्या माध्यमातून ही लोक चळवळ पुढे जाणार असून यामुळं ठाणे शहर स्वच्छ ठाणे स्वस्थ ठाणे होण्यास मदत होणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी सांगितलं. यावेळी रिक्षा चालकांना न थुंकण्याबाबत जनजागृती करणा-या पोस्टर्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात चालकांसह प्रवाशांचेही प्रबोधन करण्यात येणार आहे. थुंकण्यामुळे हवेत पसरणारे जंतू आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा विपरित परिणाम तसंच ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबरोबरच क्षयरोगाबाबतही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एक लघुनाटिकाही सादर करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading