सुलोचना सिंघानिया स्कुलला विजेतेपद

ठाण्याच्या सुलोचना सिंघानिया स्कुलने गोव्याच्या विनोद धामास्कर क्रिकेट अकॅडमीचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्विंग स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स आयोजित १२ वर्षाखालील वयोगटाच्या गोवा चषक टी २० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

पणजीत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात विनोद धामास्कर क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय यशदायी ठरला नाही. सुलोचना सिंघानिया स्कुलच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विनोद धामास्कर क्रिकेट अकॅडमीला २० षटकात ५ बाद १२२ धावांवर रोखले. त्यांच्या आर्यन चौघुलेने ५६ धावांची खेळी करत संघाच्या शतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. विनीत कामतने ३४ धावा केल्या. अभिनव वैद्य, विर धुमाळ आणि रेयांश कोळीने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल ख्यात पाडावेने ४४, शंतनू निकमने २१ आणि अद्वैत कचराजने १६ धावा करत १३ व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १२३ धावांसह विजेतेपदावर आपले नाव कोरले.
सुलोचना सिंघानिया स्कुलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत स्पर्धेत आपली छाप पाडली. कर्णधार अद्वैत कचराजला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर ख्यात पाडावेला सर्वोत्तम फलंदाज तर अरिन चौबळला सर्वोत्तम गोलंदाजाचे पारितोषिक मिळाले. अभिनव वैद्य सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. या यशाबद्दल सुलोचना सिंघानिया स्कुलच्या मुख्याध्यापिका रेवती श्रीनिवासन, सुलोनिया क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष मनिष नार्वेकर यांनी खेळाडूंसह संघाचे मुख्य प्रशिक्षक नरेश वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे.
संक्षिप्त धावफलक : विनोद धामास्कर क्रिकेट अकॅडमी : २० षटकात ५ बाद १२२ ( आर्यन चौघुले ५६, विनीत कामत ३४, अभिनव वैद्य २-३-१, विर धुमाळ ३-२६-१, रेयांश कोळी ४-२४-१) पराभुत विरुद्ध सुलोचना सिंघानिया स्कुल : १२.१ षटकात २ बाद १२३ ( ख्यात पाडावे ४४, शंतनु निकम २१, अद्वैत कचराज १६).

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading