सुरक्षारक्षकांनी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्यापूर्ण संवाद साधावा – आयुक्त

रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती जसे रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते, त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती विचारल्यास किंवा एखाद्या तपासणीबाबत चौकशी केल्यास ते सांगण्यासही कर्तव्यावरील सुरक्षारक्षक मदत करतात, हीच जबाबदारी अधिक चोखपणे पार पडण्यासाठी नागरिकांशी सौजन्याने कसे बोलावे, त्यांच्याशी कसे वागावे, त्याचबरोबर रुग्णालयात कोणाचा गैरवावर सुरू असेल तर संबंधित व्यक्तीसोबत कशा पध्दतीचे वर्तन करावे याबाबतचे प्रशिक्षण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज तीन हजाराहून अधिक रुग्ण हे विविध तपासण्यांसाठी येत असतात, तसेच त्यांच्यासोबत असणारे नातेवाईक असे मिळून साधारणपणे 4 ते 5 हजार नागरिकांची येथे नियमित वर्दळ असते. अशावेळी एखादा रुग्ण जर उपचारार्थ दाखल असेल तर त्याचे नातेवाईक हे रुग्णालयात वास्तव्यास असतात, आधीच आपल्या कुटुंबातील व्यक्ती दाखल असल्याने चितेंत असलेल्या नातेवाईकांनी एखाद्या सुरक्षा रक्षकास काही माहिती विचारल्यास जर सुरक्षा रक्षकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यास नागरिकांची चिडचिड होते, त्यातून अनेकदा भांडणे देखील होतात, परिणामी एका व्यक्तीच्या चुकीच्या वागणूकीमुळे चिडलेले नागरिक हे संपूर्ण प्रशासनाला दोष देतात. असे प्रकार घडू नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी फोर्सचे अधीक्षक रघुनाथ पालकर यांनी मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या चारही मजल्यावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. यात पुरूष जवानांची संख्या 70 तर महिला सुरक्षारक्षकांची संख्या 11 इतकी आहे. ज्या ठिकाणी महिला रुग्ण दाखल असतात, त्या ठिकाणी महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रसुती कक्षाची सुरक्षाही देखील महिला सुरक्षारक्षकांच्या हाती आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने व काटेकोरपणे 24×7 सुरक्षारक्षक तैनात असतात. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या परिसरातील आवारात रुग्ण्वाहिका सतत येत असतात. तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने देखील पार्किंग केलेली असतात. त्यामुळे जर पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना रुग्णालयाच्या आवारामध्ये वाहने उभी करण्यास मज्जाव केला जातो, त्यामुळे वादाचे प्रकार घडतात. अशी घटना घडल्यास त्यांच्याशी समजुतीने कसे वागावे, वाहने पार्क करण्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे आदींबाबतही या जवानांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनेकदा नागरिकही सुरक्षारक्षकांशी वाद घालण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी त्यांच्याशी वाद न वाढवता योग्य सल्ला देण्याबाबतच्या सूचना या मार्गदर्शन प्रशिक्षणात देण्यात आल्या.
नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही हयगय नको याकडे आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालय असो की, रुग्णालय असो कोणत्याही कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागा असा सल्लाही सुरक्षारक्षकांना या मार्गदर्शन प्रशिक्षणात देण्यात आला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading