सिग्नल शाळेतील मोहन काळे अभियंता म्हणून युरेका फोर्ब्समध्ये रूजू

ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर गजरे विकणारा मोहन काळे हा युवक युरेका फोर्ब्स या कंपनीत रूजू झाला आहे. ठाण्यातील सिग्नल शाळेमुळं ही करामत घडली आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं ५ वर्षापूर्वी तीन हात नाका येथे ५० मुलांसाठी सिग्नल शाळा सुरू झाली. रस्त्यावर मोलमजुरी करणा-यांच्या पाल्यांना या शाळेनं घडवलं. त्याचं मोहन काळे हा मोठं उदाहरण आहे. ५ वर्षापूर्वी मोहन काळे सिग्नल शाळेत दाखल झाला तेव्हा त्याचं वय दहावीत बसण्याइतकं होतं. मात्र पारंपरिक शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या मोहन काळेला सिग्नल शाळेत आठवीत दाखल करण्यात आलं तर पुढील वर्षी मोहन पूर्ण तयारीनिशी दहावीच्या परीक्षेला सज्ज झाला. दहावीमध्ये त्याला ७२ टक्के गुण मिळाले. तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मदतीने मोहन काळे रूस्तमजी ग्लोबल करिअर इन्स्टीट्यूटमध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करू लागला. एक पाय नसलेले आपले वडील आणि वयाने खंगलेली आई यांच्यासाठी आपण एकमेव आधार आहोत अशी खूणगाठ मनाशी बांधून मोहनने दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. पदविका अभ्यासक्रमानंतरच्या कॅम्पस मुलाखतीत युरेका फोर्ब्स कंपनीत मोहनची निवड झाली आणि सिग्नल शाळा ते युरेका फोर्ब्स अशा खडतर आणि रोमहर्षक प्रवासात यशाची माळ त्याच्या गळ्यात पडली. त्याचा इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करण्याचा विचार आहे. आपलं यश पाहून सिग्नल अथवा रस्त्यावरील इतर मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली तर आपल्याला जास्त आनंद होईल अशा भावना मोहन काळेनं यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading