सिग्नल शाळेचा पहिला विद्यार्थी बारावी उत्तीर्ण

ठाण्यातील सिग्नल शाळेतील पहिल्या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवले आहेत. दशरथ पवार हा विद्यार्थी दोन वर्षापूर्वी दहावी झाला होता आणि आता त्याने बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत आणखी एक लढाई सर केली आहे. समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महापालिका यांच्‍या संयुक्‍त विदयमाने तीन हात नाक्‍यावरील पुलाखाली राहत असलेल्‍या आणि महाराष्‍ट्रातील दुष्‍काळी भागातील स्‍थलांतरीतांच्‍या मुलांसाठी सिग्‍नल शाळा हा अभिनव उपक्रम पाच वर्षांपुर्वी सुरू झाला. दोन वर्षांपुर्वी या शाळेतील दोन विदयार्थी दहावी उत्तीर्ण झाले होते. आता सिग्‍नल शाळेचा दशरथ पवार हा विदयार्थी बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाला. तर मोहन काळे हा विदयार्थी सध्‍या डिप्‍लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे. त्यामुळे अठरा विश्‍व दारिद्रय आणि विस्‍थापित आयुष्‍यांना सावरण्यासाठी सरसावलेल्‍या सिग्‍नल शाळेनंही एक परिक्षा उत्‍तीर्ण केली आहे. दहावीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्‍या दशरथला पोलिस दलात सहभागी व्‍हायचे होते म्‍हणून त्‍याने ज्ञानसाधना महाविदयालयात कला शाखेत प्रवेश घेतला. अकरावी- बारावी करीत असतांना तो दादोजी कोंडदेव स्‍टेडियम येथील भोसले पोलिस अकादमीत पोलिस प्रशिक्षण घेत होता. रोज सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत शाररिक कसरतींचे सहा तासांचे श्रमवणारे प्रशिक्षण करून दशरथ ज्ञानसाधना महाविदयालयात पुन्‍हा १ ते ६ वाजेपर्यंत कॉलेज करत असे. बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्‍यानंतर आता त्‍याला पोलिस दलातील भरतीसाठी उतरायचे असून पोलिस होण्‍याची त्‍याची इच्‍छा आहे. पारधी समाजाला गुन्‍हेगारी समाज म्‍हणून त्‍याची हेटाळणी केली जाते. पोलीस होऊन या समाजातील मुलंही उच्‍चशिक्षण घेऊ शकतात आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी आपले योगदान देऊ शकतात हा संदेश सर्वापर्यंत पोहचवायचा असल्याचं दशरथनं सांगितलं. सिग्‍नल शाळेच्‍या शिक्षिका आरती परब, प्रियांका पाटील, सुमन शेवाळे, ज्ञानसाधना महाविदयालयातील प्राचार्य चंद्रशेखर मराठे, प्राध्‍यापिका भारती जोशी, सुप्रिया कर्णीक, अश्विनी ओंधे, चारूलता देशमुख, सुनिता जमने, सीमा केतकर यांच्‍या सहकार्याने दशरथ हे शैक्षणिक यश प्राप्‍त करू शकला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading