सहायक आयुक्त प्रणाली घोंगेची बदली राजकीय दबावातूनच

महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांची बदली राजकीय दबावातूनच झाली आहे. अनधिकृत बांधकामांच्या पाठिशी राहणाऱ्या काही विशिष्ट नेत्यांच्या प्रभावाखाली महापालिका आयुक्तांकडून राजकीय अजेंडा राबविला जात आहे. या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी आयुक्तांनी घोंगे यांची बदली केली, असा घणाघाती आरोप नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. अशा प्रकारातून अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होईल. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामेही फोफावतील अशी भीती वाघुले यांनी व्यक्त केली आहे. घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांविरोधात वेगाने कारवाई करण्यासाठी कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी प्रणाली घोंगे यांची नियुक्ती झाली होती. हितसंबंध दुखावलेल्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रणाली घोंगे यांची अवघ्या महिनाभरातच बदली करण्यात आली. सहायक आयुक्तपदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला किमान दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जातो. मात्र, आयुक्तांनी राजकीय दबावापोटी घोंगेंची बदली केली. तर सहायक आयुक्तपदाचा कार्यभार शंकर पाटोळे यांच्याकडे सोपविला. यापूर्वीही पाटोळे यांच्याकडे कळवा प्रभाग समितीची सुत्रे होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली होती. अशा परिस्थितीत अनधिकृत बांधकामे रोखणार कोण? असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनानेच अनधिकृत बांधकामांना पाठबळ दिले असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रणाली घोंगे यांच्या बदलीमुळे कळवा परिसरात बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या माफियांना आता मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे या भागात अनधिकृत बांधकामांचे इमले उभारले जातील. घोंगे बदली प्रकरणाने घोलाईनगर येथील दुर्घटनेनंतरही महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचं संजय वाघुले यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading