सर्बियातील सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला विजेतेपद

ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू नुबैरशाह शेखने आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोचताना सर्बियात झालेल्या सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत अपराजित वाटचाल करत नुबैरशाहने नऊ फेऱ्यामध्ये सात गुणांची कमाई करत सन्मानचिन्ह, सुवर्णपदकासह एक लाख दहा हजार सर्बियन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ७७, ६०५ रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे. म्युन्सिपालटी वेलीको ग्रॅडिस्ट, चेस फेडरेशन ऑफ सेंट्रल सर्बिया आणि दानुबिया हॉटेल आयोजित स्पर्धेच्या शेवटच्या, नवव्या फेरीत नुबैरशाहने हंगेरीच्या क्रस्तुलोव्हीच ऍलेक्सचा पराभव करत आपले विजेतेपद निश्चित केले . चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात नुबैरशाहने ७० चालींच्या खेळानंतर हा विजय नोंदवला. सामन्यात नुबैरशाहची अडखळत सुरुवात झाली. पण डावाच्या मध्यात नुबैरशाहने क्रस्तूलोव्हीचला वारंवार चुका करायला भाग पाडून सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. स्थापत्यशास्त्रातील पदवीधर असलेल्या नुबैरशाहने या स्पर्धेतून १५ गुणांची कमाई करत ग्रँडमास्टर किताबाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading