सध्याच्या परिस्थितीत मतदारांना मोदीच सक्षम पर्याय वाटतो – भाऊ तोरसेकर

सध्याच्या परिस्थितीत मतदारांना मोदीच सक्षम पर्याय वाटतो. थिल्लर आणि बालिश विरोधी पक्षाला नव्हे तर मतदार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सक्षम भारतीय जनता पक्षाला मतदान करतील. यावेळचं मतदान हे स्थैर्यासाठी होईल आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल असा ठाम विश्वास ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केला. दिनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित बाबा अम्रावतकर स्मृती व्याख्यानात बोलताना त्यांनी आम्ही मतदार या विषयावर बोलताना हा विश्वास व्यक्त केला. लोकशाही टिकवण्यासाठी बळकट विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. पण आजचा विरोधी पक्ष पोरकट आहे. मतदार अशा विरोधी पक्षाला निवडून देणार नाहीत. मतदार स्थिर सरकारसाठी मतदान करतील. २०१४ पेक्षाही जास्त जागा मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला मिळतील असं तोरसेकर यांनी सांगितलं. लोकशाहीचं संवर्धन सामान्य माणसंच करतात. अभिजन, उच्चभ्रू केवळ चर्चा करतात. श्रीमंत समृध्द वस्त्यातून मतदान होण्याचं प्रमाण कमी असतं. उपेक्षित समाज मतदान आवर्जून करतो. गोंधळलेल्या बुध्दीजीवी विचारवंतांच्या नादाला न लागता सत्य लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे. माहितीच्या ओझ्याखाली दबून न जाता त्यातील उपयुक्त काय हे शोधलं पाहिजे असंही भाऊ तोरसेकर यांनी सांगितलं. पोलीस अधिकारी मुश्रीफ यांचे हू किल्ड करकरे हे पुस्तक काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. या पुस्तकात मुश्रीफ यांनी करकरे यांना इन्टेलिजन्स ब्युरोनं मारले असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंग यांनी ते नाकारलेलंही नाही. मुश्रीफ यांच्या लिखाणानुसार हेमंत करकरे हे अतिरेक्यांच्या गोळीस बळी पडले नसतील तर ते हुतात्मा कसे हा प्रश्न पत्रकारांनाही पडत नाही. प्रश्न विचारण्याबाबत दुहेरी भूमिका घेणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळे काढत आहेत. सत्य जाणून घेण्याचा अधिकार सामान्य मतदाराला असताना त्यांच्यापर्यंत सत्य पोहचूच दिलं जात नाही परंतु सामान्य मतदार योग्य निर्णय घेतील असं भाऊ तोरसेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading